पुणे जिल्हा | मेंढपाळाच्या पालात शिरूर बिबट्याचा महिलेवर हल्ला

ओतूर, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वाघदरातील कुडाचे माळ परिसरात सोमवारी (दि. 7) पहाटे बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावरील पालात घुसून महिलेवर हल्ला करून तीला जखमी केले.
यावेळी या मेंढपाळाच्या पालामध्ये या महिलेची दोन मुले व सुन आणि आठ महिन्यांचा नातू ही पालात झोपले होते.
सुदैवाने मोठी दुर्घटनाच टळली असल्याची भावना स्थानिक नागरीक व्यक्त करत असून मेंढपाळाच्या कुत्र्यांनी गोंगाट केल्याने बिबट्या पळून लावले आहे.
मिराबाई बरू बरकडे (वय 44) असे बिबट हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून सोमवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.
बिबट्याच्या हल्यानंतर जखमी महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचरासाठी पहाटे आणले असता येथील डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी तिच्यावर उपचार करून वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचार्याच्या पथकाने या महिलेला पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे नेले.
या बिबट हल्ल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, मेंढपाळांने ओतूरमधील वाघदरा येथील कुडाचे माळ येथे आबांदास डुंबरे यांच्या शेतात रात्रीचा मुक्कामी मेंढ्याचा वाडा ठेवला होता. एकूण 150 मेंढ्याच्या वाड्यात पाल ठोकूण मेंढपाळ कुटूंब झोपले होते.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने पालात झोपलेल्या मिराबाई बरकडे यांच्यावर हल्ला करून उजव्या हाताला चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला .
मात्र मेंढ्या बरोबर असलेल्या कुत्र्यांनी आक्रमकपणे भुकून बिबट्याला पळवून लावले. कुत्र्यांच्या गोगाटामुळे मिराबाई यांचे दोन्ही मुले अमोल बरकडे व राहूल बरकडे आणि सुन व आठ महिन्यांचा नातू सर्व जागे झाले.
मुलानी अभिषेक गाढवे यांना फोन करून बिबट्या हल्ला केल्याची माहिती दिल्यावर अभिषेक त्याना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी संतोष डुंबरे, अभिषेक गाढवे, नारायण डुंबरे, दीपक डुंबरे, भरत डुंबरे, हरिभऊ डुंबरे, मिलिंद डुंबरे, संतोष खंडागळे, महादू खंडागळे, तुळशीराम खंडागळे यांनी केली आहे.





