मांडवगण फराटा, (वार्ताहर)- आमदार अशोक पवार यांनी ’आमदार आपल्या गावी मुक्कामी’ हा उपक्रम शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात सुरू केला असून प्रत्येक ठिकाणी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना आपल्या समस्यांसाठी सरकार दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागतात. परंतु आपणच त्यांच्या गावामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत या संकल्पनेतून रांजणगाव सांडस येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेकडो स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. त्यातील काही समस्यांचा त्वरित निपटारा करण्यात आला असून उर्वरित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकार्यांना केल्या. आमदार अशोक पवार यांनी निधी अभावी प्रलंबित असणार्या कामांसाठी शिरूर -हवेलीत मतदार संघात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन केले. प्रत्येक ठिकाणी आमदार अशोक पवार यांचे भव्य स्वागत केले. विकास कामांना निधी उपलब्ध करून दिला याबद्दल नागरिकांनी आभार मानले. माजी सभापती सुजाता पवार यांनीही अनेक ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन केले. नवरात्रोत्सव निमित्ताने अनेक महिलामंडळांना भेटी देऊन त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. येणार्या सर्व प्रकारच्या समस्या आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर राहणार आहोत असे त्यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी शिरूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात लोकांच्या सेवेसाठी सदैव हजर असून आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधीची विकास कामे झाली असून काही पूर्णत्वास आली आहेत काही थोड्याच दिवसांत पूर्ण होतील. विकास कामे होत असताना सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यात कोणतेही राजकारण करू नये. आमदार आपल्या गावी मुक्कामी हा अभिनव उपक्रम सुरू केला असून सामान्य जनतेच्या अनेक समस्या जागेवरच सुटण्यास मदत झाली. सर्व प्रशासकीय अधिकारी एकाच वेळेस उपलब्ध असल्याने जनतेची कामे मार्गी लागली. शरदचंद्र पवार साहेबांच्या बरोबरच राहून भविष्यात देखील या मतदारसंघात विकास कामांना निधीची कमतरता भासणार नाही. -अॅड. अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली