Shirur Election Result: शिरूरमध्ये भाजप ठरला ‘नंबर वन’, पण नगराध्यक्ष मात्र राष्ट्रवादीचा; वाचा नक्की काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – शहरात प्रथमच राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हावर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ११ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐश्वर्या पाचरणे यांनी बाजी मारली आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये झालेली हायव्होल्टेज लढत आणि प्रस्थापितांचा झालेला पराभव यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.
प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये नितीन पाचरणे, रवींद्र ढोबळे, संतोष थेऊरकर, पूजा पोटावळे, सागर नरवडे, सुनील जाधव, आणि मितेश गादिया यांचा समावेश आहे. दुसरीकडे मुजफ्फर कुरेशी, संजय देशमुख, विनोद भालेराव, रेश्मा लोखंडे, सुरेखा शितोळे आणि निलेश लटाबळे यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काही प्रभागांमध्ये राजकीय वारसा असलेल्या उमेदवारांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळाला, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी चुरस निर्माण केली होती.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐश्वर्या पाचरणे यांनी सुवर्णा लोळगे, अलका खांडरे, रोहिणी बनकर आणि वैशाली वाखारे यांचा पराभव केला. विकसित शिरूरच्या विकासाची जबाबदारी आता या नवीन प्रतिनिधींवर असून आगामी काळातील विकासकामांकडे शहराचे लक्ष लागले आहे.





