Shirur Crime: शिरूरमध्ये चोरट्यांची दहशत! एकाच रात्रीत साडेसहा लाखांवर डल्ला; खाद्यतेलाचे ८० डबेही लांबवले
Shirur Crime: चोरट्यांचा शिरूर परिसरात उच्छाद: एकाच रात्रीत ४.४० लाखांचे सोन्याचे दागिने-रोख रक्कम आणि १.८४ लाखांचे खाद्यतेल चोरटे पसार.

Shirur Crime – शिरूर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून (दि.२९) एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मलठण येथील घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरात उभ्या असलेल्या टेम्पोचे लॉक तोडून १ लाख ८४ हजार रुपयांचे खाद्यतेलाचे ८० डबे चोरट्यांनी चोरून नेले.
पहिल्या घटनेत मलठण (माळवस्ती) येथील शेतकरी दत्ता चंदर वाव्हळ (वय ३५) यांच्या घरात (दि.२९) जुलै रोजी रात्री ते (दि.३०) जुलै सकाळी या दरम्यान चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील कपाटाचे लॉकर फोडून बोरमाळ, पानपोत, दोन मंगळसूत्र, नथ, कर्णफुले, लहान मुलाची अंगठी, सोन्याचे मणी असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याचवेळी शेजारी शरद किसन गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत बाबुरावनगर येथील स्वप्नील सूर्यकांत सुराणा (वय ४४) यांच्या श्रेयांक्ष ट्रेडिंग कंपनीसमोरील अशोक लेलँड टेम्पोमध्ये ठेवलेले ४० डबे सोयाबीन तेल आणि ४० डबे सूर्यफूल तेल,
असे एकूण ८० डबे चोरट्यांनी टेम्पोचे लॉक तोडून चोरून नेले. तेलाची एकूण किंमत १ लाख ८४ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. दहा दिवसांपूर्वी सविंदणे येथेही दिवसा ढवळ्या घरफोडी होऊन 14 तोळे सोने चोरीला गेलेले आहे. ही घटना अजून उघडकीस आलेली नाही.
तसेच इनामगाव येथेही आठ दिवसापूर्वी एक घरफोडी झाली. तिचाही तपास लागणे बाकी आहे. सलग घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे शिरूर शहर व तालुक्यात नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





