Shirur Crime: आजोबांवर नातवाचा क्रूर हल्ला! शेतात काम करायला सांगितले म्हणून केला खून; आरोपीला बेड्या
Shirur Crime: मृत वृद्धाच्या मुलाने दिली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद; क्षणिक रागातून नातवाने आजोबांचा जीव घेतल्याने गावात हळहळ.

Shirur Crime – शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. 15) सकाळी घडली. शिरूर पोलिसांनी आरोपीला काही तासांत ताब्यात घेतले आहे. दशरथ यशवंत राऊत (वय 84, रा. बाभुळसर बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय 26) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी मृतांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या राहत्या घरात ही घटना घडली. दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना देत होते. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सोमनाथने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले.
डोक्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध आजोबांचा स्वतःच्या नातवाकडून झालेला खून समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध घेतला आणि काही तासांतच सोमनाथ राऊत याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी घटना
शेतातील काम करण्यास सांगितल्याच्या कारणावरून घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. क्षणिक राग आणि कौटुंबिक वादातून एका नातवाने आपल्या वृद्ध आजोबांचा जीव घेतल्याने नातेसंबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेबद्दल गावकर्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





