Shirur Crime | शेतातील वाद चिघळला! महिलेला मारहाण, गळा दाबून फेकले जमिनीवर ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्ती येथे शेतातील वादातून महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी धुरपाबाई देवराम शिंदे (वय ६०, रा. हिलाळ वस्ती, कवठे येमाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली. धुरपाबाई आपल्या जाऊ सुशिला दत्तात्रय शिंदे व शोभा विनायक शिंदे यांच्यासह शेतात काम करून घरी जात असताना वाद निर्माण झाला.
दरम्यान, फिर्यादींच्या शेत गट नं. १६३१/१ मध्ये आरोपी हरीदास मुलमुले यांनी आपली गुरे बांधली होती. याबाबत फिर्यादींनी हरकत घेतल्यावर त्याचा मुलगा सुरज हरीदास मुलमुले याने उर्मटपणे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सुरज, संगीता, बाळू, संग्राम व पमा मुलमुले या पाच जणांनी धावत येऊन फिर्यादींना शिवीगाळ केली. आरोपी संगीता हिने फिर्यादींचे केस पकडून गळा दाबला व जमिनीवर पाडले, तसेच सर्वांनी मिळून हातांनी मारहाण केली व धमकावले.या घटनेनंतर शिंदे यांनी शिरूर पोलिसात तक्रार नोंदवली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे करीत आहे.




