प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर शहरासह शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचे सत्र थांबायचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोऱ्या, दरोडे, मारहाणीच्या घटना आणि अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणाने शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलीस असूनही शहरात गुन्हेगारांचे साम्राज्य बळावत असल्याचे चित्र आहे.दोनच दिवसांपूर्वी शिरूर शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ भागात असलेल्या एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानावर पहाटेच्या वेळी चोरांनी दरोडा टाकून कोटींच्या घरातील सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला. या घटनेने शहरातील व्यापारी वर्गासह ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू असून, चोरांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, दि. २६ रोजी शहरातील एका महाविद्यालयाबाहेर सुमारे २५ तरुणांच्या टोळक्याने एकाला जबर मारहाण केली. तसेच, त्याच टोळक्याने मलठण येथील एका विद्यार्थ्याला त्याची कोणतीही चूक नसताना रामलिंग येथे मारहाण केली. ही घटना भरदिवसा घडल्याने विद्यार्थी व पालकवर्गात प्रचंड संताप पसरला आहे. दिवसाढवळ्या विद्यालयाबाहेर हे सर्व घडत असताना पोलीस नक्की काय करत होते? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. फक्त एवढेच नव्हे तर, दुचाकी चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरीला जात आहेत. तसेच, अवैध धंद्यांना ऊत आल्याने गुन्हेगारी जगत अधिक बेफाम झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची माहितीही पत्रकारांना दिली जात नाही, गुन्हा उघड झाल्यानंतरच मग प्रेस नोट दिली जाते, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, पोलीस प्रशासनाने या घटनांवर आळा घालण्यासाठी तात्काळ कडक पाऊले उचलावीत, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. पोलिसांनी शहरात गस्त वाढवावी व गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी. शिरूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून पोलीस अधीक्षकांनी शिरूरकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता शिरूर पोलिसांनी ऍक्टिव्ह मोडमध्ये येऊन दबंग कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक करत आहे.