Shirur Crime: शिरूरमध्ये कॉलेज तरुणीची भररस्त्यात छेड; पोलिसांनी २४ तासांत आरोपी मुसक्या आवळल्या
Shirur Crime: शिरूर शहरातील पाबळ फाटा परिसरातील घटना; सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शिरूर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.

Shirur Crime – कॉलेजमधून घरी परतणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीची भररस्त्यात छेड काढल्याची गंभीर घटना शिरूर शहरात घडली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित विद्यार्थिनीचे नाव कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून रोजी कॉलेज सुटल्यानंतर एसटी बस उशिराने असल्याने संबंधित विद्यार्थिनी पाबळ फाटा रिक्षा स्टँडकडे पायी जात होती. त्यावेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या एका तरुणाने तिचा पाठलाग केला. त्याने वाहन आडवे लावून विद्यार्थिनीचा मार्ग अडवला व गाडीत बसण्याचा आग्रह केला. यावेळी आरोपीने अश्लील हावभाव करत विद्यार्थिनीच्या मनात भीती व लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे.
मात्र, प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने त्याला ठाम नकार दिला आणि रिक्षाने सुरक्षितपणे घरी पोहोचली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर सुरुवातीला घाबरलेल्या विद्यार्थिनीने काही दिवसांनी पालकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर 19 जून रोजी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला.
तपासादरम्यान विकी रामदास पवार (रा. आंबळे, ता. शिरूर) याला 20 जून रोजी उशिरा ताब्यात घेण्यात आले. संबंधित वाहनही जप्त करण्यात आले असून विद्यार्थिनीने आरोपी व वाहनाची ओळख पटविल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला 21 जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते करीत आहेत.





