शिरूर : भीमा नदीच्या काठावर सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

शिरूर – सादलगाव (ता.शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर ३० ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादलगाव (ता.शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर माणसिंग माणिक होळकर (वय ३८ वर्षे रा. सादलगाव ता.शिरूर जि. पुणे ) हे बुधवारी (दि.०५) रोजी नदीकाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अनोळखी पुरूष उताणे अवस्थेत नदीकाठी पाण्यावर तरंगत असताना दिसून आला.
याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अनोळखी पुरूषाला पाण्यातून बाहेर काढत शिरूर येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका-यांनी सदर अनोळखी व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत माणसिंग माणिक होळकर (वय ३८ वर्षे रा. सादलगाव ता.शिरूर जि. पुणे ) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नारायण गवळी करत आहे.





