Shirur Accident – सरदवाडी (ता. शिरूर) येथील राजस्थान ढाबा परिसरात एका उभ्या ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तामिळनाडू येथील ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली असून, अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान ढाब्याच्या पार्किंगमध्ये ट्रक (टीएन ८८ एम १८६४) उभा होता. ट्रक चालक बालसुब्रम्हण्यम मुर्गेशन (रा. तामिळनाडू) याने आपला ट्रक सुरू करून तो पुढे नेला. मात्र, यावेळी ट्रकच्या मागील चाकाखाली योगेश आसाराम साठे (वय २९, रा. मालगाव, जि. जालना) हा तरुण झोपलेला होता. चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने ट्रकचे चाक योगेशच्या कंबरेवरून गेले, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र किसन बनकर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रक चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील ढाबा आणि पार्किंग परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.