Shirish Gavas Died : ‘रेड सॉईल स्टोरीज’ चॅनेलचा निर्माता शिरीष गवसचा दुर्दैवी मृत्यू

सिंधुदुर्गातील ग्रामीण जीवनशैली युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या ‘रेड सॉईल स्टोरीज’ या लोकप्रिय चॅनेलचे निर्माते शिरीष गवस (वय ३३) यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. ही बातमी समोर येताच शिरीष आणि त्यांच्या पत्नी पूजा गवस यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्याने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला होता आणि त्याचा व्हिडीओ ‘रेड सॉईल स्टोरीज’ चॅनेलवर शेअर केला होता. या व्हिडीओखाली चाहते आता शोकसंदेश आणि श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.
कोरोना काळात जेव्हा सारे जग ठप्प झाले होते, तेव्हा शिरीष आणि पूजा गवस यांनी मुंबई सोडून सिंधुदुर्गातील आपल्या गावात परतण्याचा निर्णय घेतला.शिरीष आयटी क्षेत्रात, तर पूजा चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती. गावात परतल्यानंतर त्यांनी कोकणातील दैनंदिन जीवन, खाद्यसंस्कृती, आव्हाने आणि गमतीजमती यांचे चित्रण करणारे ‘रेड सॉईल स्टोरीज’ हे युट्यूब चॅनेल सुरू केले. सध्या या चॅनेलला ४ लाख २७ हजार सबस्क्राइबर्स असून, त्यांनी आतापर्यंत १६१ व्हिडीओ अपलोड केले आहेत.
शिरीष गवस यांच्या निधनाची बातमी ऐकून कोकणातील प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर अंकिता प्रभूवालावलकरने इन्स्टाग्रामवर शोक व्यक्त केला. “शिरीषच्या निधनाची बातमी ऐकून धक्काच बसला, यावर विश्वासच बसत नाही,” असे तिने आपल्या स्टेटसमध्ये लिहिले. तसेच, २ ऑगस्ट रोजी शिरीष यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती तिने दुसऱ्या पोस्टद्वारे दिली.
काय घडले नेमके?
सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली गावात राहणारे शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांचा दुःखद अंत झाला.
शिरीष यांचे वडील निवृत्त नायब तहसीलदार होते. एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेल्या शिरीषने मुंबईत नामांकित कंपनीत नोकरी केली होती, तर पूजा चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती. कोरोना काळानंतर ते गावी स्थायिक झाले आणि ‘रेड सॉईल स्टोरीज’सारखा अनोखा उपक्रम सुरू केला. ऑक्टोबर २०२३ मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गवस दाम्पत्याने आपल्या प्रवासाबद्दल, चॅनेल सुरू करण्यापूर्वीच्या आव्हानांबद्दल आणि यशाबद्दल मोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या.
शिरीष गवस यांच्या निधनामुळे कोकणातील सांस्कृतिक आणि डिजिटल विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याला चाहते आणि सहकारी यांच्याकडून सतत आदर मिळत राहील.





