शिर्डी शहराचं रूप पालटणार – मंत्री विखे

नगर – शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील 52 कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी,यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. “विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.
शिर्डी संस्थान सभागृहात वास्तूविशारद तज्ज्ञ अजय कुलकणी यांनी या सौंदर्यकरण आराखड्याचे चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केले. त्यानंतर पत्रकारांशी मंत्री विखे यांनी संवाद साधला. याप्रसंगी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, तहसीलदार अमोर मोरे उपस्थित होते.
विखे म्हणाले, शहर, मंदिर परिसर, परिक्रमा मार्गाचे सुशोभीकरण, सौंदर्यस्थळे विकसित व्हावीत यासाठी राज्य शासनाकडून शिर्डीसाठी 52 कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्तयातील कामांना तीन महिन्यात सुरूवात होईल. सौंदर्यकरण, सुशोभीकरण करतांना ग्रामस्थांच्या सूचनाचा विचार करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी गावाच्या मूळ ढाच्याला कोठेही धक्का लागू न देता शिर्डी शहराचा अंर्तबाह्य चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून 50 कोटी रूपये खर्चून साईबाबांच्या जीवनाची माहिती देणारा “थीम पॉर्क’ उभारण्यात येणार आहे. शेती महामंडळाच्या जागेवर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी 70 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.




