मुंबई- मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकांना एकाही मंत्र्याने 100 टक्के हजेरी लावलेली नसून “दांडीबहाद्दर’ मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. त्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, सुनील केदार, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, हसन मुश्रीफ, डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांच्या नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी पहिली मंत्रिमंडळ बैठक बोलावली. तेव्हापासून 23 डिसेंबर 2021पर्यंत मंत्रिमंडळाच्या 94 बैठका झाल्या. त्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीचा तपशील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागवला होता. यावर मुख्य सचिव कार्यालयाने 94 बैठकीचा उपस्थित तक्ता दिला आहे. यात आधीच्या 8 बैठकीत फक्त उद्धव ठाकरे, अजीत पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे 7 जणच मंत्रिमंडळात होते. त्यानंतर 86 बैठका झाल्या आहेत. यामध्ये मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्वाधिक दांडी मारली असून संख्या ही 26 आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे 21, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत 20, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार 20, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे 19, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे 19, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ 16, माजी वन मंत्री संजय राठोड 16, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत 15, भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार 15, कृषी मंत्री दादाजी भुसे 13 अशी आकडेवारी आहे. यात ब-याच वेळा मंत्र्यांनी प्रत्यक्ष सहभाग न घेता व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत सहभाग घेतला आहे तर काहींनी हजर न राहण्याबाबत लेखी विनंती केली आहे.