Eknath Shinde : शिंदेच्या ‘या’ आमदाराच्या अडचणीत वाढ; अभिनेत्रीने दाखल केली तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार अडचणीत येत असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या एका आमदाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका अभिनेत्रीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या एका आमदाराच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्या आमदाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोण आहे ‘हा’ आमदार?
रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्री हेमांगी राव यांनी तक्रार दाखल केली आहे. भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा आरोप हेमांगी राव यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत हेमांगी राव यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता फडणवीस आणि शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मुंबई-पुणे जुना महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांडरोली गावाच्या हद्दीत अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे डॉक्टर पती विनोद राव यांची जमिन आहे. नवीमुंबई येथील व्यावसायिक विकासक दिपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. वाधवा ही जमिन बळजबरीने आणि दादागिरीचा वापर करत हस्तगत करत असल्याचा आरोप राव कुटुंबांकडून करण्यात आला आहे.
आमची जमीन जबरदस्तीने मिळवण्यासाठी दिपक वाधवा यांना आमदार थोरवे हे मदत करत असल्याचा आरोप राव कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. यानंतर अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी थोरवे आणि वाधवा यांच्या विरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.





