Shiv Sena Shinde : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार उडाला असून, घडामोडींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. अशातच मुंबई महापालिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. महापालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, जानेवारीत निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेत जागा वाटपावरून तणाव असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोठी कंबर कसली आहे. २२७ नगरसेवकांची संख्या असलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे पक्षाने मोठी मागणी केली आहे. थेट १२५ जागांची मागणी पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदेसेनेच्या या मागणीवर भाजपने मात्र एक वेगळीच अॅाफर दिल्याची माहिती आहे. शिवसेना (शिंदे गट) मुंबई महापालिका निवडणुकीत १०० ते १२५ वॉर्डमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. पण भाजपकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नाही, अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन शिवसेना झाल्या. पण मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाकडून फुटीनंतर ४६ नगरसेवक सामिल झाले आहेत. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षातून काही माजी नगरसेवकांनी आपल्या हाती धनुष्यबाण घेतले आहे. यामुळे शिंदेंची ताकद वाढलेली आहे. शिंदे गटाकडे मुंबईतील जवळपास १२५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या सर्वच जागा मिळाव्यात यासाठी पक्ष आग्रही आहे.
जागावाटपावरून तणाव
शिंदेसेनेला भाजप केवळ ७० जागा देण्यास तयार आहे, अशी माहिती आहे. याचे कारण म्हणजे मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. जास्तीत जास्त नगसेवक महापालिकेत जातील यासाठी पक्ष प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या महापौरपदी आपलाच नगरसेवक बसवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू केले आहेत. २२७ जागांपैकी १५० जागेवर विजय मिळविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यामुळे यंदाच्या मुंबईत निवडणुकीत जागावाटपावरून सेना भाजपमध्ये मोठा संघर्ष असल्याचे दिसत आहे. यामधून कोणता निर्णय अंतिम केला जाईल, हे नजीकच्या काळात समजणार आहे.
हेही वाचा : युनूस सरकारची शेख हसीनांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ; आज ढाक्यामध्ये मोठ्या स्क्रीनवर निकालाचे थेट प्रक्षेपण