अजित पवारांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर शिंदेंची नजर; फडणवीसांचा मोठा निर्णय

मुंबई : महायुती सरकारमध्ये असलेला अंतर्गत वाद आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त माध्यांमांमध्ये येत होते. महायुतीत मागून येऊन देखील देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर जास्त विश्वास असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी महायुतीत एकनाथ शिंदेंकडे मोठी जबाबदारी दिली आहे. फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवारांचे महत्त्व कुठे ना कुठे कमी होताना दिसत आहे.
अंतर्गत वाद टाकण्यासाठी मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमध्ये असलेला अंतर्गत वाद टाकण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आता सर्व प्रकारच्या फायली उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील. एकंदरीतच काय तर अजित पवारांनी घेतलेला प्रत्येक निर्णयावर एकनाथ शिंदेची नजर असणार आहेत. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार दिला आहे. फडणवीस यांच्या निर्देशानुसार याबाबतचे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंगळवारी काढले आहेत.
शासकीय आदेश म्हणजे अजित पवारांना धक्का
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केलेल्या सूचनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फायलींचा प्रवास एकनाथ शिंदेंच्या मार्फत करण्याच्या सूचना प्रशासनाला द्यावा लागल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. हा शासकीय आदेश म्हणजे एकप्रकारे अजित पवारांनाही धक्का असल्याचे बोलले जात आहे. आजवर महत्त्वपूर्ण फायलींच्या या प्रवासातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते. प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत बाजूला फेकले गेलेल्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा विश्वासात घेण्याची वेळ सत्ताधार्यांवर आली आहे, असं चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Ajit Pawar)
मुख्यमंत्री असतानाच शिंदेनी काढला होता आदेश
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्व प्रकारच्या फायली या थेट मुख्यमंत्र्यांकडे न येता आधी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृह तसेच विधी व न्यायमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील. त्यानंतरच सर्व फाईली आपल्याकडे येतील, असा आदेश काढला होता. त्यामुळे प्रत्येक लहानमोठ्या निर्णयात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका राहत होती. (Eknath Shinde)
आता एकनाथ शिंदेनाही फायली बघण्याचे अधिकार
मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे महायुतीचे सरकार स्थापन होताना नाराज होते. फडणवीस आणि शिंदे यांच्यात दुरावा असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील काही फायली बाहेर उघड होत होत्या. त्यामुळे शिंदे हे नाराज होते. शिंदे यांनी तशी तक्रार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. त्यानंतर शहा यांनी फडणवीस यांना, शिंदे यांची नाराजी दूर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता शिंदे यांनाही महत्वाच्या फायली बघण्याचे अधिकार मिळाले आहेत.





