Eknath Shinde : शिंदेंकडून गोऱ्हेंच्या ‘त्या’ विधानाची पाठराखण; थेट ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण… म्हणाले गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे…

मुंबईः शिवसेनेच्या नेत्या डॅा. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली होती. साहित्य संमेलनाच्या एका प्रश्नाच्या उत्तरावर गोऱ्हें यांनी दोन मर्सिडिज दिल्या की एक पद असे उत्तर दिले होते. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे गटाकडून जाहीर निषेध करण्यात आला. त्यांच्या विधानाच्या विरोधात उबाठातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी डॅा. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या विधानाची पाठराखण केली. अंधेरी येथे शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या आभार सभेत बोलताना शिंदेंनी या प्रकरणावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
लाडकी बहिण डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिल्लीच्या साहित्य संमेलनातील व्यासपीठावरुन एक वाक्य बोलल्या ते काही जणांना प्रचंड झोंबले. गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्याने त्यांना मिरच्या लागल्या, अशा खरमरीत शब्दांत शिंदेंनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले. निलम गोऱ्हे त्यांच्याबाबत आताच बोलल्यात असे नाही, यापूर्वी अनेक लोक बोलले आहेत.
https://twitter.com/mieknathshinde/status/1894451385132785909
राज ठाकरे बोलले त्यांना खोके नाही तर कंटेनर लागतात. नारायण राणे, रामदास कदम, नितेश राणे, निलेश राणे देखील यापूर्वी बोलले आहेत. मात्र लाडकी बहिण डॉ. निलम गोऱ्हे बोलल्या. त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे तुम्हाला शोभत नाही. त्या खरे बोलल्या. आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. निलमताई जे बोलल्या ते कटुसत्य आहे, असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या निलमताई होत्या. शक्ती विधेयकामध्ये निलमताईंचे योगदान मोठं आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम कसं करायची ही पोटदुखी आहे. तुम्ही डॉक्टरकडून नाही तर कंपाऊंडरकडून औषध घेत असल्याने पोटदुखी बरी होत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुबंई महापालिका सोन्याची अंडी देणारी कोंबडी
काहीजणांचा जीव हा आता मुंबई महापालिकेत अडकलेला आहे. मुंबई महापालिका यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते. त्या लोकांना आता आणखी एक धक्का द्यायची वेळ आली असल्याचे शिंदे म्हणाले. मिशन मुंबईच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना आपल्याला कायमचे घरी बसवायचे असून मुंबई महापालिकेवर भगवा डौलाने फडकवूया, असे आवाहन एकनाथ शिदेंनी यावेळी बोलताना केले.





