कराडमध्ये शिंदेंच्या सेनेला धक्का? रणजीत पाटलांना ‘धनुष्यबाण’ नाहीच; एबी फॉर्म नक्की कुणी अडवला?

प्रभात वृत्तसेवा
कराड – शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडला कोट्यवधींचा निधी दिला. मात्र, कराडमध्ये पालिका निवडणूका पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढवता येत नसल्याची खंत आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदासाठी माझी अपक्ष उमेदवारी आहे. त्याशिवाय प्रभागातील समविचारी अपक्षांची मोट बांधून, पालिकेत नवा पर्याय देणार आहे. आता पाच अपक्ष सोबत असून, बारा जण संपर्कात आहेत.
मतदार साथ देतील, असा विश्वास शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते रणजीत पाटील यांनी व्यक्त केला.रणजित पाटील यांनी आपली भूमिका रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. त्यांच्यासोबत प्रभागातील ज्योती पवार, प्रताप इंगवले, शैला पाटील, विनायक मोहिते, वंदना गायकवाड व पूनम धोत्रे हे पाच अपक्ष उमेदवार उपस्थित होते. पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून कराडमध्ये विकास केला.
त्याच्या माहितीचे ‘सेवापर्व’ हे पुस्तक घराघरांत पोहोचवत आहे. पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा मनोदय होता. मात्र, काही कारणांनी ते शक्य झाले नाही. आम्हाला शिवसेनेतून अर्ज भरायला सांगितले होते. ते भरलेही. मात्र, ए,बी फॉर्म आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत. राजकीय परिस्थितीमुळे पक्षाच्या वरिष्ठांनी तसा निर्णय कदाचित घेतला असेलही; परंतु या निवडणुकीत धनुष्यबाणाचे चिन्ह नसल्याची खंत आहे.
या निवडणुकीत आम्ही कराडकरासंमोर नवा पर्याय ठेवला आहे. त्याला लोक पसंती देतील, अशी अपेक्षा आहे. कराड पालिकेवर भगवा फडकावा, अशी दिवंगत नेते आनंद दिघे यांची इच्छा होती. 1994 साली कराडला आले असता, त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत. यावेळी ते शक्य झाले नसल्याची बरीच कारणे आहेत. आता अपक्षांची मोट बांधत आहोत. शिवसेनाचाच विचार जोपासला जाईल. पुढच्या दोन दिवसात किमान 10 प्रभागांमधील अपक्ष आमच्यासोबत येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.





