Political News : शिंदेंनी डाव साधला…अकोल्यात मोठी घडामोड! पाच नगरसेवकांनी हाती घेतलं धनुष्यबाण
Political News : मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं चित्र आहे.

Political News : राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विधानपरिषदेतील पराभवावरून दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अकोल्यात मोठी राजकीय खेळी केली आहे. मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढल्याचं चित्र आहे.
पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप दौलतराव सरनाईक, सारिता काळे पाटील, पूनम रवी मोडक, ममता कैलास महाजन आणि शुभांगी संदीप सरनाईक यांचा समावेश आहे. या पाचही नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मूर्तिजापूरसह अकोल्यातील स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
निलेश देशमुख यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, या पाचही नगरसेवकांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी अॅड. निलेश देशमुख यांची अकोल्यात भेट घेतली होती. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे.
शिवा मोहोड यांचाही शिवसेनेत प्रवेश
दरम्यान, अकोल्यातील राजकीय नेते शिवा मोहोड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोहोड यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. तसेच ते महानंदचे संचालक, अकोला जिल्हा दूध संघाचे संचालक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि अकोला महापालिकेचे माजी बांधकाम सभापती राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशालाही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
अकोल्यात आणखी राजकीय भूकंप होणार?
अकोल्यात आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय चेहरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती अॅड. निलेश देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.





