विधानपरिषदेसाठी शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब; राजकीय कारकीर्द काय?

Vidhan Parishad Election 2025 : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या २७ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून आज १७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यात महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यासाठी भाजपाकडून काल तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तासांपूर्वी आता शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून विधानपरिषदेसाठी चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटाचे विधानपरिषदेचे उमेदवार असणार आहेत. मात्र,अजित पवार गटाकडून अद्यापही नावं जाहीर करण्यात आलेले नाही.
चंद्रकांत रघुवंशी यांची राजकीय कारकीर्द
धुळे आणि नंदुरबार जिल्हा एकत्र असताना चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून २१ मार्च १९९२ ते १९९७ आणि २१ मार्च १९९७ ते ३१ डिसेंबर १९९८ कामकाज पहिले होते. चंद्रकांत रघुवंशी यांना काँग्रेसकडून १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००३ पर्यंत पहिल्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली होती. यानंतर एक जानेवारी २००४ ते १ जानेवारी २०१० या या कालावधीसाठी त्यांना विधान परिषदेवर दुसऱ्यांदा काँग्रेसकडून संधी मिळाली. तर, २४ एप्रिल २०२४ ते २ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान काँग्रेसने त्यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवले होते.
रघुवंशी नंदुरबार तालुका आमदार समितीच्या चेअरमनपदी आहेत. त्यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. सूर्यवंशी यांच्या पत्नी सलग चार वेळा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पंधरा वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती सत्ता अबाधित आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार आणि धडगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली. नंदुरबार जिल्हा परिषदेवर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक सदस्यांची निवड झाली.
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
दरम्यान, चंद्रकांत रघुवंशी आज दुपारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थिती अर्ज भरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. विधानपरिषदेच्या पाच आमदारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्याचा विजय झाला होता. त्यामुळे त्यांच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. या जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडीच्या संख्याबळ बघता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.





