Raj kundra । Shilpa shetty : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राज कुंद्रा यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. राज कुंद्रा हा बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आहे. पोर्नोग्राफी प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांच्या घरावर, कार्यालयासह अन्य ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. पोर्नोग्राफीची ही बाब अनेक वर्षे जुनी असून, आता पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉर्न रॅकेट प्रकरणात ईडी केवळ राज कुंद्राच्या घरांचीच नाही तर इतर अनेक लोकांचीही झडती घेत आहे. ही कारवाई मोबाइल ॲप्सद्वारे पॉर्न सामग्री तयार करण्याशी संबंधित आहे आणि ही चौकशी मुंबई पोलिसांच्या 2021 च्या प्रकरणावर आधारित आहे. मुंबई आणि उत्तर प्रदेशात 15 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्याही घरी ईडीने ही कारवाई केली आहे.
पैशांच्या व्यवहारांची चौकशी केली :
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने या प्रकरणी एकूण 15 ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणात देशात जमा झालेला पैसा या व्हिडिओंच्या माध्यमातून परदेशात हस्तांतरित करण्यात आला होता. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात पैसे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले असून, आता ईडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
राज कुंद्राला 2021 मध्ये अटक :
राज कुंद्रा याला गुन्हे शाखेने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. या प्रकरणी शहर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राज कुंद्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणी त्याला दोन महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता. सध्या राज कुंद्रा तुरुंगाच्या बाहेर असला तरी, आता मात्र पुन्हा एकदा तो तुरंगात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.