Shikrapur : फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई
Shikrapur : शिक्रापूर पोलिसांनी मॉडिफाइड सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ वाहनांवर कारवाई केली. २२ हजारांचा दंड वसूल करून वाहने १५ दिवस ताब्यात ठेवली.

Shikrapur : मॉडिफाइड सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या तसेच फटाक्यासारखा मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरोधात शिक्रापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी तब्बल २२ वाहनांवर कारवाई करून २२ हजार रुपयांचा दंड वसूल केला असून ही वाहने १५ दिवसांसाठी ताब्यात ठेवली आहेत.
शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिक्रापूर, कोरेगाव भीमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी, करंदी परिसरातून मॉडिफाइड सायलेन्सर आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेत पोलिसांनी अशा वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित केले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, राहुल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सोमनाथ कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लहानु बांगर तसेच पोलीस हवालदार दामोदर होळकर, संदीप इथापे, नवनाथ केंद्रे आणि शरद धुरपते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मॉडिफाइड सायलेन्सर, कर्णकर्कश आवाज करणारी उपकरणे तसेच फटाक्यासारखा मोठा आवाज करणाऱ्या बुलेटसह २२ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहने १५ दिवस पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आली आहेत.
कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा वाहनांवर यापुढेही सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नियमांचे उल्लंघन करून मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या किंवा फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या दुचाकींवर उपलब्ध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
वेळ-ठिकाणाचा मुलाहिजा नाही –
कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरच्या वाहनांवर वेळ, ठिकाण किंवा व्यक्तीचा कोणताही मुलाहिजा न ठेवता यापुढेही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. परिसरातील नागरिकांना शांततामय आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.





