Crime : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत अखेर अटकेत; नऊ गुन्ह्यांची नोंद
Crime : शिक्रापूर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरार असलेल्या पृथ्वीराज राठोडला वाकी येथे अटक केली. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत नऊ गुन्हे दाखल आहेत.

Crime (कोरेगाव भीमा) : खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि जबरी चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसह नऊ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (वय २३, रा. भोसे, काळूस रोड, ता. खेड) असे आरोपीचे नाव आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात २४ जून २०२४ रोजी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होता. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. तो खेड तालुक्यातील वाकी येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
राठोड याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात चार, तर दहीवडी, चाकण, शिक्रापूर आणि सासवड पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेश कोळी, पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश भंडारे, राम जाधव, नारायण वाळके, मच्छिंद निचीत, विकास बांगर आणि भारत भोसले यांनी सहभाग घेतला.आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास बांगर करीत आहेत.





