Shikrapur News : केंदुरमध्ये पानातील अपायकारक पावडर जप्त; आरोपीला अटक
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या (Shikrapur News) अवैध व्यवसायांविरोधात पुन्हा एकदा धडक मोहीम उघडली आहे.

Shikrapur News : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या (Shikrapur News) अवैध व्यवसायांविरोधात पुन्हा एकदा धडक मोहीम उघडली आहे. पोलिसांनी मौजे केंदूर येथील पऱ्हाडमळा परिसरात छापा टाकून खाण्याच्या पानामध्ये मिसळून विक्रीसाठी ठेवलेली, उग्र वासाची संशयित अपायकारक पावडर जप्त केली आहे.
या प्रकरणी तुषार राहुल पऱ्हाड (वय २६) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल (Shikrapur News) करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुपचूप सुरू असलेल्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश
केंदूर येथील पऱ्हाडमळा परिसरात तुषार पऱ्हाड हा युवक त्याच्या घरात पानामध्ये मिसळून खाण्यासाठी वापरली जाणारी, मानवी शरीराला घातक ठरू शकणारी उग्र वासाची पावडर बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता तात्काळ कारवाईचे नियोजन केले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, विशाल देशमुख तसेच फॉरेन्सिक पथकाच्या प्रणोती पटले, मुस्तकीम सय्यद आणि प्रेम भालेराव यांनी केंदूर येथील संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकला.
पोलिसांनी तुषारच्या घरामागील पत्राशेडची कसून झडती (Shikrapur News) घेतली असता, तिथे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लपवून ठेवलेली उग्र वासाची संशयित पावडर आढळून आली. पोलिसांनी कायदेशीर नियमांनुसार सदर पावडर जप्त करून सील केली आहे. या पावडरीचे नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी
या प्रकरणी पोलिसांनी तुषार राहुल पऱ्हाड (वय २६ वर्षे, रा. पऱ्हाडमळा, केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली. त्यानंतर आरोपीला शिरूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.
“खाण्याच्या पानातून अंमली किंवा घातक पदार्थांचे व्यसन लावून मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा अवैध प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. अशी कोणतीही माहिती मिळाल्यास पोलीस तात्काळ धडक कारवाई करतील. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.”
चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस स्टेशन)






