Shikrapur News: शिरूर तालुक्यात मोठी कारवाई! तब्बल ४ टन बेकायदेशीर मांगूर मासे केले नष्ट; चौघांवर गुन्हा दाखल
Shikrapur News: परप्रांतीयांनी भाड्याने जागा घेऊन उभारले होते तळं; मत्स्यव्यवसाय आयुक्त अर्चना शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा.

Shikrapur News – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिंदे वस्ती येथे बेकायदेशीरपणे बंदी असलेल्या मांगूर माशांचे संवर्धन केल्याची घटना समोर आली. याबाबत शिक्रापूर पोलीस व मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी कारवाई करीत चार टन मासे नष्ट केले. जागा मालक ऋषिकेश आप्पासाहेब शिंदे व दिलीप चंदर शिंदे (दोघे रा. विठ्ठलवाडी), परप्रांतीय ग्यानेंद्र नाथ बाला (सध्या रा. विठ्ठलवाडी ता. शिरूर, मूळ रा. पश्चिम बंगाल), नवीन विश्वास (सध्या रा. लोणीकंद, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
तळेगाव ढमढेरे येथील शिंदे वस्ती येथे काही जणांनी जमिनीमध्ये तळे बनवून त्यात मांगूर माशांचे संवर्धन केल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही माहिती मत्स्य व्यवसाय आयुक्तांना देत सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड, हवलदार संदीप इथापे, अमोल चव्हाण, शिवम हरपळे, कोतवाल भरत मोडक, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अर्चना शिंदे,
सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी दीपाली गुंड यांनी छापा टाकला. परप्रांतीय ग्यानेंद्र नाथ बाला व नवीन विश्वास यांनी ऋषिकेश शिंदे व दिलीप शिंदे यांच्याकडून जागा भाड्याने घेऊन माशांसाठी तळे केल्याचे दिसून आले. दरम्यान, पथकाने तळ्यामध्ये मासे पकडण्याचे जाळे टाकून तपासणी केली. त्यात बंदी असलेले मांगूर मासे दिसून आले.
यावेळी पथकाने महसूल विभागाच्या परवानगीने जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करून त्यामध्ये चार टन मासे टाकून त्यावर मीठ व ब्लिचिंग पावडर टाकून चार टन मासे नष्ट केले. याबाबत मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अर्चना धीरज शिंदे (रा. हडपसर, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड हे करीत आहेत.





