Shikrapur Accident | भरधाव टँकरने घेतला कष्टकरी महिलेचा बळी ; पाबळ-केंदूर रस्त्यावर अपघात

प्रभात वृत्तसेवा
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. वंदना कैलास घोडे (वय ४२, रा. टाकळी हाजी) असे मृत महिलेचे नाव असून, दुचाकीचालक लक्ष्मण घोडे गंभीर जखमी झाले आहेत.लक्ष्मण घोडे हे त्यांच्या दुचाकीवरून चुलती वंदना घोडे यांना घेऊन केंदूर येथे जात असताना, महादेववाडी रस्त्याजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. टँकरचे चाक वंदना यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दुचाकीचालक लक्ष्मण घोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी टँकरचालक विश्वनाथ विष्णू ढमाले (रा. कडूस, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष शेळके करत आहेत.
टाकळी हाजी परिसरात हळहळ
टाकळी हाजी येथील वंदना घोडे यांच्या पतीचे निधन झाले असून, त्या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. कामगारांसाठी मिळणारे भांड्यांचे कीट घेण्यासाठी पुतण्यासोबत जात असताना झालेल्या या दुर्दैवी अपघातात त्यांना जीव गमवावा लागल्याने टाकळी हाजी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



