IPL 2024 : दुखापतीनंतर शिखर धवन मैदानात कधी परतणार? पंजाबच्या कर्णधाराबाबत मोठे अपडेट आलं समोर…

Shikhar Dhawan injury update : पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन शेवटचा सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसला होता. पण पुढच्या सामन्यानंतर म्हणजेच राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात सॅम करन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसला.
आता पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी सांगितले की, शिखर धवन दुखापतीतून लवकर बरा होत आहे, मात्र आणखी काही दिवस विश्रांती घेऊ शकतो. सुनील जोशी यांनी सांगितले की, धवन कदाचित केकेआर विरुद्धच्या सामन्याला मुकेल पण 1 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करू शकतो.
शिखर धवनच्या पुनरागमनाबद्दल पंजाब किंग्जचे गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी म्हणाले, “शिखर धवन फॉर्मात होता आणि आम्ही त्याची फलंदाजी खूप मिस करत आहोत. आम्ही काल त्याला फलंदाजी करताना पाहिले, तो नेटमध्ये खूप सराव करत आहे. आशा आहे की तो पुढील सामन्यापर्यंत बरा होईल.” धवन दुखापतग्रस्त आहे आणि तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही, अशी चालू चर्चा होती आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक करताना सॅम करनने या बाबत पुष्टी केली होती. त्यानंतर 3 सामन्यांसाठी पंजाबचे कर्णधारपद सॅम कुरनकडे सोपविण्यात आले आहे.
धवनच्या अनुपस्थितीत पंजाबने गमावले सलग 3 सामने …
शिखर धवनच्या दुखापतीनंतर पंजाब किंग्जने 3 सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पीबीकेएसला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 3 विकेट्सने, मुंबई इंडियन्सविरुद्ध 9 धावांनी आणि गुजरात टायटन्सविरूध्द 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आयपीएल 2024 मध्ये, पंजाबला 8 सामन्यांत केवळ 2 विजय नोंदवता आले आहेत आणि संघ सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. पंजाबचा पुढचा सामना आज (26 एप्रिल) केकेआर विरुद्ध होणार आहे आणि यासुध्दा सामन्यास शिखर धवन मुकू शकतो.





