Sher-e-Kashmir: श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर दसरा
Sher-e-Kashmir:

पुनीत बालन ग्रुप आणि काश्मिरी पंडित संघर्ष समितीतर्फे आयोजन
Sher-e-Kashmir: काश्मीरमधील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहअस्तित्वाची परंपरा अधोरेखित करणारा दसरा उत्सव श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर उत्साहात साजरा करण्यात आला. काश्मिरी पंडित संघर्ष समिती आणि पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात काश्मिरी पंडितांसह मुस्लिम, हिंदू, शीख, तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक सहभागी झाले.
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या उत्सवातून काश्मीरमधील विविध धर्मांच्या अनुयायांमधील परस्पर आदर, सामाजिक सलोखा आणि सहअस्तित्वाचा संदेश देण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध समुदायांतील नागरिक सोहळ्यात सहभागी झाले.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पुनीत बालन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि व्यवस्थापकीय सहकार्यामुळे उत्सवाचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले.
आयोजनासाठी काश्मिरी पंडित संघर्ष समितीने श्रीनगर जिल्हा प्रशासन, श्रीनगर पोलीस आणि संपूर्ण पोलीस प्रशासन, जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (जेकेसीए), श्रीनगर महापालिका, वाहतूक पोलीस, तसेच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाचे आभार मानले. जेकेसीएकडून मैदान आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले.
काश्मीरमध्ये दसऱ्याच्या माध्यमातून विविध धर्मांचे आणि समुदायांचे नागरिक एकत्र येणे, ही अत्यंत आनंद आणि अभिमानाची बाब आहे. सण-उत्सव हे केवळ धार्मिक परंपरांचे प्रतीक नसून, समाजातील माणसे जोडण्याचे आणि परस्परांमधील विश्वास अधिक दृढ करण्याचे प्रभावी माध्यम आहेत. काश्मीरची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्यासाठी अशा उपक्रमांना सहकार्य केल्याचे समाधान आहे.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.





