Sheikh Hasina: शेख हसीना सध्या भारतातच राहणार; मोदी सरकारने व्हिसाची मुदत वाढवली

नवी दिल्ली – भारतात आश्रयाला आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना व्हिसा मुदतवाढ देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. भारताच्या या निर्णयामुळे यावर स्पष्ट शिक्कामोर्तब झाले आहे की बांगलादेशने मागणी केली असतानाही भारत हसीना यांना मायदेशी परत पाठवणार नाही. शेख हसीना यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांसाठी त्यांचे भारताने प्रत्यार्पण करावे अशी मागणी बांगलादेशातील युनूस सरकारने केली होती.
शेख हसीना यांच्या पासपोर्ट रद्द केल्यानंतरही भारताने त्यांना व्हिसा मुदतवाढ दिली आहे. आपल्या या कृतीतून भारताने बांगलादेशला स्पष्ट संदेश दिला आहे की हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याचा भारताचा कोणताही इरादा नाही. त्यामुळे आता बांगलादेश याबाबत काय प्रतिक्रिया देतो याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना बांगलादेशातील बीएनपी पक्षाचे ज्येष्ठ सरचिटणीस रूहुल कबीर रिझवी म्हणाले हसीना यांच्या व्हिसाला मुदतवाढ देणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे. तथापि, यामागे कोणता चुकीचा हेतू आहे किंवा नाही याबाबत आम्हाला कल्पना नाही. एक लोकशाही देश एका मारेकऱ्याला कशी शरण देऊ शकतो आणि व्हिसा वाढवू शकतो? बांगलादेशातील लोकांनी ही बाब सकारात्मकपणे घेतली नाही.
दरम्यान, शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे अनेक सहकारी, माजी अधिकारी, सल्लागार आणि लष्कराचे अधिकारी यांच्या विरोधात बांगलादेशात वॉरंट जारी करण्यात आले आहे.





