ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अन्य १७ जणांविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्याचे कामकाज आजपासून सुरू झाले. हसीना यांच्याशिवाय ज्या १७ जणांविरोधात खटला चालवला जाणार आहे, त्यामध्ये हसीना यांची भाची आझमिना सिद्दीक आणि ब्रिटीश खासदार तुलिप सिद्दीक यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात गृहनिर्माण भूखंड प्रकरणी खटला चालवला जाणार आहे. ढाकामधील न्यायालयात या सर्वांविरोधातल्या खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली. या सर्वांविरोधातल्या तक्रारी पहिल्यांदा नोंदवून घेतल्या जाणार आहेत, असे माध्यमांनी म्हटले आहे. ऍन्टी करप्शन कमिशनचे सहायक संचालक असलेले आफनान जन्नत हे या प्रकरणी तक्रारदार आहेत. त्यांनी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मोहम्मद रबिउल आलम यांच्यासमोर आज आपली साक्ष नोंदवली, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. यापूर्वी दुसऱ्या भ्रष्टाचार प्रकरणाचे तक्रारदार असलेले एसीसीचे उपसंचालक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी देखील त्यांचे म्हणणे मांडले. लंडनमध्ये वास्तव्य करणारे सिद्दीक हे लंडनमधील हॅम्पस्टेड आणि हायगेट येथील लेबर पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. एसीसीच्या भ्रष्टाचारविषयक आरोपांमुळे त्यांनी ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाचा या वर्षाच्या सुरुवातीला राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले असून डॉ. युनूस यांच्या हंगामी सरकारकडून आपल्या बदनामीची मोहिम राबवली जात असल्याचा आरोपही तुलिप सिद्दीक यांनी केला आहे. दिनांक ११ ऑगस्ट रोजी भूखंड वाटपात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या तीन इतर प्रकरणांमध्ये जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली, या प्रकरणात हसीना, त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय आणि मुलगी सायमा वाजेद पुतुल यांचा समावेश होता. पूर्वाचल न्यू टाउन प्रकल्पांतर्गत भूखंड वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेने १२ ते १४ जानेवारी दरम्यान हसीना, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह २३ इतरांविरुद्ध सहा गुन्हे दाखल केले आहेत.