Shehbaz Sharif : झरदारीच पाकिस्तानचे अध्यक्ष राहणार; पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे स्पष्टीकरण

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अध्यक्षपदी आसिफ अली झरदारी हेच कायम राहतील, असे स्पष्टिकरण पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिले आहे. झरदारी यांना अध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागेवर लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांना नियुक्त केले जाण्याची चर्चा सुरू असताना शरीफ यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे. जनरल आसिम मुनीर यांनी कधीही अध्यक्ष बनण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. त्यांना त्या पदाची अपेक्षाही नाही. अध्यक्ष बदलण्याचा कोणताही प्रस्ताव देखील नाही, असे शरीफ यांनी म्हटले आहे.
झरदारी, मुनीर आणि आपल्यामध्ये चांगला संवाद आहे. परस्परांच्या आदरावर आपले संबंध आधारलेले आहेत. पाकिस्तानची प्रगती आणि समृद्धी हेच आम्हा तिघांचेही उद्दिष्ट असल्याचेही शरीफ म्हणाले. अध्यक्ष बदलण्याची अफवा दुष्प्रचार करण्याच्या मानसिकतेतून पसरवण्यात येत असल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर लगेचच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही याबाबत स्पष्टिकरण दिले आहे.
हा दुष्प्रचार कोण करत आहे, हे आपल्याला माहिती असल्याचेही नक्वी म्हणाले होते. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचा रोख परदेशी शक्तींबाबत होता. झरदारी आणि त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी दोघांचेही पाकिस्तानच्या आघाडी सरकारशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते आहे. अलिकडे भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या लष्करी संघर्षानंतर काही देशांमध्ये पाकिस्तानची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या पाक संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व बिलावल भुट्टो, झरदारी यांनी केले होते.





