Shehbaz Sharif : शहबाझ शरीफ यांच्याकडून पाक लष्कराची पाठराखण; भारतीय हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याबद्दल केले कौतुक

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाक लष्कराने तत्परतेने चोख प्रत्युत्तर दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे. भारताने केलेल्या हल्ल्याच्यावेळी पाक लष्कर सज्ज होते. भारताला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या पाक लष्कराचे आपल्याला कौतुक असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
भारताबरोबर वाढलेल्या तणावाच्या मुद्द्यावर संसदेतल्या अधिवेशनाला संबोधित करताना ते बोलत होते. पाकिस्तानी लष्कराने भारतीय हवाई दलाची ५ विमाने नष्ट केल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. प्रत्यक्ष्यात भारताच्या कोणत्याच विमानाला पाकिस्तानने पाडले नसून पाकमधील सोशल मीडियावरून जुने व्हिडीओ व्हायरल होत असून अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
काल रात्री भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये ८० विमाने सहभागी झाली होती. मात्र पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हा धोका परतवून लावला, असा दावा देखील शरीफ यांनी केला. भारतीय हवाई दलाकडून हल्ला केला जाण्याची पुर्वकल्पना मिळाली असल्यामुळे पाक लष्कर सज्ज होते, असे सांगून शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दल आणि हवाई दल प्रमुखांचे कौतुकक केले. आम्ही भारताची राफेलसह अन्य विमाने पाडली. राफेलची यंत्रणा पाकिस्तानने जॅम केली होती. भारताची ड्रोन देखील पाडली, असा दावाही शरीफ यांनी केला. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दर यांनी देखील भारताच्या हल्ल्यांसमोर पाकिस्तानने संयम बाळगल्याचा दावा केला.
मरियम नवाझ यांच्याकडूनही दावा
पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ५ विमाने पाडल्याचा दावा पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनीही केला आहे. भारताची ५ विमाने पाडल्याचा क्षण राष्ट्रीय गौरवाचा क्षण आहे. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून भारताच्या हेकटपणा, अहंकार आणि अपप्रचाराला आज धुळीस मिळवण्यात आले असल्याची टिप्पणीही मरियम यांनी केली. पाकिस्तानने जगाला एक मोठा आणि स्पष्ट संदेश दिला आहे. हा पाकिस्तान आहे. जे आमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना नेहमीच पश्चात्ताप करावा लागतो,असे त्यांनी म्हटले आहे.





