Shegaon | Hair Loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये हा केस गळतीचा प्रकार समोर आला आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांमधील अनेक नागरिकांचे अवघ्या आठवड्याभरात टक्कल पडले. या घटनेनंतर आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. अचानक केस गळती सुरू झाल्याने आजुबाजूच्या गावातील नागरिक घाबरले आहेत. अवघ्या 3 दिवसामध्ये 60 पेक्षा अधिक नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांमध्ये लहान मुले, वृद्ध महिला पुरुष, तरूण-तरूणी सर्वांचचा समावेश आहे. मात्र, केसगळती व टक्कल पडण्याचे नक्की कारण काय, हे अद्याप समोर आलेले नाही. कोणत्या आजारामुळे असे घडले की काही संसर्ग झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोग्य विभागाने या गावांचे सर्वेक्षण देखील केले आहे. तसेच, यामागचे कारण जाणून घेण्यासाठी त्या भागातील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नागरिक केस गळती सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. डॉक्टरांनी यामागे शॅम्पूचा वापर असण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, टक्कल पडलेल्या लोकांमध्ये असेही काहीजण होते, ज्यांनी शॅम्पूचा कधीही वापर केलेला नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. भोंनगाव येथील भिकाजी मोरखडे यांच्या कुटुंबातील 3 जणांचे टक्कल पडले आहे. त्यात लहान मुलांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने सुरुवातीला त्यांना गोळ्या दिल्या होत्या, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज पुन्हा त्यांची तपासणी केली असून नमुने घेतले आहेत. सध्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने देखील जोपर्यंत केस गळतीचे नेमके कारण सापडत नाही तोपर्यंत गावकऱ्यांनी गावातील बोअरवेल आणि विहिरीचे पाणी वापरू नये, अशी सूचना गावकऱ्यांना दिली आहे. आज अकोला मेडिकल कॉलेज आणि बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य विभागाची एक मोठी टीम या गावात दाखल झाली होती. गावकऱ्यांच्या केस, रक्त, तसेच त्वचेचे नमुने पुन्हा एकदा या टीमने गोळा केली आहेत. त्यामुळे पुढचे आठ दिवस तरी या नमुन्यांचे परीक्षण अहवाल प्राप्त होण्यास लागतील असं सांगण्यात आलं आहे.