शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओवर आदित्य ठाकरे म्हणतात, “… हे म्हणजे बेशरमपणा आहे’

मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप पसरला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, आता शीतल म्हात्रे त्यांच्या या आरोपांना ठाकरे गटाकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शीतल म्हात्रे यांच्यावर कडक शब्दात हल्लाबोल केला आहे. “आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवायची म्हणजे बेशरमपणा आहे’. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘असे व्हीडिओ मॉर्फ कसे होऊ शकतात आणि नक्की काय झालं, हे देखील महत्त्वाचं आहे. कारण असे व्हीडिओ मॉर्फ होऊ लागले तर ते सर्वांसाठीच धोक्याचं आहे..’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. नुकतंच गोरेगावमध्ये शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेनंतर त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.
काय आहे नेमका प्रकार वाचा…
दहिसरमध्ये शनिवारी 11 मार्च रोजी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. भूमिपूजन, उद्घाटन, रॅली आणि भाषण पार पडलं. एकूण 4.30 तास हा कार्यक्रम होता. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या रॅलीत सहभागी झाले होते. व्हीडिओ काढणाऱ्यांनी आपल्या सोयीच्या अँगलने व्हीडिओ काढला आणि एडीट केला. यावरुन सर्व राजकारण पेटलं असून, अनेक राजकीय नेते यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.





