Pankaja Munde : आधी म्हणाल्या रिटायर्ड व्हावंसं वाटतं, आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; मोठा इशारा देत नेमकं काय म्हणाल्या?
Pankaja Munde : वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी पुन्हा एक सूचक वक्तव्य केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आता रिटायर्ड व्हावंसं वाटतं असल्याचे वक्तव्य केले होते. ज्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यानंतर आता या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी पुन्हा एक सूचक वक्तव्य केल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
“कोणीतरी बातमी दिलेली ताई रिटायर होणार, काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे, रिटायर काय व्हायचंय,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की “दोन चार लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही रिटायर व्हायचं.” त्यामुळे आता या दोन चार व्यक्ती नेमक्या कोण आहेत? याविषयी चर्चा रंगली आहे. त्यांचा नेमका रोख कुणाकडे होता असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना आणि परळीतील कवी संमेलनाच्या समारोपात मंत्री पंकजा मुंडे यांनी निवृत्तीबाबत विधान केले होते. रस्त्याच्या दुरवस्थेवरून बोलताना त्या म्हणाल्या, “या रस्त्यावर खडखड करत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्याने प्रेरणा मिळते.”
पाच वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते
“आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे ही भावना असते. मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले, खूप कष्ट काढले. देवाने सुखाने खाऊ दिलं नाही, ते पाच वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते हा मला विश्वास आहे.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्यासाठीच काम करतोय ही भावना आहे, असेही त्यांना यावेळी बोलताना सांगितले.






