“ती” सौंदर्य स्पर्धांमध्ये कोणत्याही मेकअपशिवाय सहभागी झाली आणि जिंकलीही; 94 वर्षांच्या इतिहासातील विक्रम

लंडन – जगाच्या पाठीवर कोणत्याही शहरात होणारी सौंदर्य स्पर्धा म्हणजे विविध प्रकारचा मेकअप करून स्वतःच्या सौंदर्याचे प्रदर्शन करणाऱ्या युवती हेच समीकरण मांडले जाते. पण नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या मिस इंग्लंड स्पर्धेमध्ये एका युवतीने कोणताही मेकअप न करता या सौन्दर्य स्पर्धेत भाग घेतला. मिस इंग्लंड स्पर्धेच्या 94 वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
या तरुणीचे वय वीस वर्षे असून तिचे नाव मेलीसा असे असून आजपर्यंत जे धाडस कोणत्याही युवतीने दाखवले नव्हते ते तिने या स्पर्धेच्या निमित्ताने दाखवले आहे. याबाबत बोलताना मेलीसा म्हणाली मी फारशी सुंदर नाही याची कल्पना मला आहे आणि कोणताही मेकअप करून मला माझे सौंदर्य वाढवायचे नाही. त्यामुळेच मी कोणताही मेकअपचा थर न चढवता या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या या निर्णयाचे स्वागत संयोजकांनी केले याचा मला आनंद आहे. निसर्गाने मला जे सौंदर्य दिले आहे त्याचं प्रदर्शन करणे मला योग्य वाटले.
कृत्रिमरीत्या या सौंदर्यामध्ये वाढ करणे मला योग्य न वाटल्याने मी हा निर्णय घेतला असे तिने म्हटले आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये तिने हा धाडसी निर्णय घेतला आणि तिच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत करताना संयोजकांनी आणि परीक्षकांनी तिला अंतिम फेरीत प्रवेश दिला. मिस बेअर फेस या विशेष पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. मिस इंग्लंड स्पर्धेच्या संयोजक एजी बेंसल यांनीसुद्धा मेलीसाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (“She” participated in beauty pageants without any make-up and even won)



