Kriti Kharbanda : मनोरंजन क्षेत्रात यायचं नव्हतं पण…; क्रितीने सांगितली कधीही न ऐकलेली गोष्ट म्हणाली “त्या एका होर्डिंगमुळे…”
Kriti Kharbanda : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश कसा झाला, याबाबत अनेक गोष्टी उघड केल्या.

Kriti Kharbanda : प्रत्येक कलाकाराला मनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या प्रवासात अनेक चढ-उतार येतात; मात्र, या अडचणींवर मात करत जो पुढे जात राहतो, तोच यशाच्या शिखरावर पोहोचतो. अभिनेत्री क्रिती खरबंदाचाही प्रवास काहीसा असाच आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश कसा झाला, याबाबत अनेक गोष्टी उघड केल्या.
एका होर्डिंगमुळे मिळाली पहिली चित्रपटाची संधी!
क्रिती खरबंदाला सुरुवातीला अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा कोणताही विचार नव्हता. शिक्षण पूर्ण करत असतानाच ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करत होती. याच काळात चेन्नईतील एका जाहिरातीच्या होर्डिंगवर झळकलेला तिचा फोटो चित्रपट निर्माते राज पिप्पल्ला यांच्या नजरेस पडला. ते त्यांच्या तेलुगू चित्रपटासाठी एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात होते. क्रितीचा फोटो पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या टीमला तिच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
१५० मुलींमधून झाली निवड
क्रितीने सांगितले की, सुरुवातीला तिला कोणीतरी आपली मस्करी करत असल्याचे वाटले. मात्र, जेव्हा ती हैदराबादला पोहोचली, तेव्हा तिला ही संधी खरोखरच मिळाल्याचे समजले. तिने चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि सुमारे १५० मुलींमधून तिची निवड झाली. कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर तिने ही संधी स्वीकारली. अशाप्रकारे २००९ मध्ये ‘बोनी’ या तेलुगू चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.
‘शादी में जरूर आना’मुळे मिळाली खरी ओळख
तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केल्यानंतर क्रितीने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावले. २०१६ मध्ये इम्रान हाश्मीसोबत ‘राझ रिबूट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटाने तिला हिंदी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात तिने आरती शुक्लाची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
यानंतर क्रिती ‘गेस्ट इन लंडन’, ‘यमला पगला दीवाना फिर से’, ‘हाऊसफुल ४’, ‘पागलपंती’, ‘ताइश’ आणि ‘१४ फेरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत तिने मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०२० मध्ये ‘हाऊसफुल ४’मधील अभिनयासाठी तिला लायन्स गोल्ड अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.
अभिनेता पुलकित सम्राटसोबत बांधली लग्नगाठ
क्रितीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, तिने अभिनेता पुलकित सम्राटसोबत १५ मार्च २०२४ रोजी लग्न केले. चित्रपटांमध्ये एकत्र काम करताना दोघांची ओळख झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
Jharkhand : चक्रीवादळाचा झारखंडला तडाखा; अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा





