Yami Gautam: बॉलिवूड सोडून हिमाचलला जाण्याचा निर्णय घेतला होता; पण राष्ट्रीय पुरस्कार जिंकत ‘या’ चित्रपटाने बदललं यामी गौतमचं आयुष्य
Yami Gautam यामीने 2012 मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटामुळे तिची दखल घेतली गेली. मात्र त्यानंतर अपेक्षेप्रमाणे चांगल्या भूमिका तिला मिळाल्या नाहीत. चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असताना अनेकदा मनाविरुद्ध काही भूमिका स्वीकाराव्या लागल्या. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूप निराश झाली होती.

Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम आज बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘आर्टिकल 370’, ‘ओएमजी 2’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले आहे. मात्र आज ज्या यामीला यश मिळत आहे, तीच यामी एक काळ असा होता की बॉलिवूड सोडून कायमची हिमाचल प्रदेशात परत जाण्याचा विचार करत होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरमधील कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
यामीने 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटामुळे तिची दखल घेतली गेली. मात्र त्यानंतर अपेक्षेप्रमाणे चांगल्या भूमिका तिला मिळाल्या नाहीत. चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असताना अनेकदा मनाविरुद्ध काही भूमिका स्वीकाराव्या लागल्या. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूप निराश झाली होती. (Yami Gautam)
एका मुलाखतीत यामीने सांगितले की, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘बाला’ हे चित्रपट मिळण्यापूर्वी मी बॉलिवूड कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचल प्रदेशात परत जाणार होते. आमच्याकडे शेतीची जमीन आहे. तिथे जाऊन पूर्णपणे वेगळं आयुष्य सुरू करण्याचा माझा विचार होता. (Yami Gautam)
यामीने सांगितले की, त्या कठीण काळात तिच्या आई-वडिलांनी तिला खंबीर साथ दिली. त्यांनी तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. उलट, “घरी परत ये, आम्ही तुझ्यासोबत आहोत,” एवढेच त्यांनी सांगितले. त्यामुळे तिला मानसिक आधार मिळाला आणि पुढचा निर्णय घेणे सोपे झाले. (Yami Gautam)

Yami Gautam: बॉलिवूड सोडून हिमाचलला जाण्याचा निर्णय घेतला होता; पण राष्ट्रीय पुरस्कार जिंकत ‘या’ चित्रपटाने बदललं यामी गौतमचं आयुष्य
तिने या संपूर्ण प्रवासातून एक महत्त्वाचा धडा शिकल्याचेही सांगितले. भीतीमुळे किंवा अपयशाच्या दबावामुळे निर्णय घेऊ नयेत. स्वतःवर विश्वास ठेवला आणि योग्य संधीची वाट पाहिली, तर यश नक्की मिळते, असे तिने सांगितले.
2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट यामीच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘बाला’ या चित्रपटानेही तिच्या अभिनयाला मोठी दाद मिळाली. या दोन चित्रपटांनंतर यामीकडे वेगळ्या आणि दमदार भूमिका येऊ लागल्या. तिच्या करिअरला नवी दिशा मिळाली आणि ती पुन्हा एकदा आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत पोहोचली. (Yami Gautam)
‘उरी’ या चित्रपटामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातही मोठा बदल झाला. या चित्रपटाच्या सेटवर तिची ओळख दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी झाली. पुढे दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. 2024 मध्ये या दाम्पत्याच्या घरी मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ‘वेदविद’ असे ठेवण्यात आले.
यामीने गेल्या काही वर्षांत ‘दसवी’, ‘चोर निकल के भागा’, ‘ओएमजी 2’, ‘हक’ आणि ‘आर्टिकल 370’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, यामीच्या मेहनतीला मोठे यश मिळाले असून तिला ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. एकेकाळी बॉलिवूड सोडण्याचा विचार करणाऱ्या यामीने जिद्द, संयम आणि मेहनतीच्या जोरावर आज राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. तिचा हा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





