जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या ऐनवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावनिक कुचंबणा होत आहे. पक्षाकडून उमेदवारी नाकारली जाऊ लागल्याने अनेक इच्छुक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असताना, काहींना मात्र पक्षासोबत राहूनही तिकीट मिळाले नाही. यामुळे एका महिला उमेदवाराला रडू कोसळले. प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले. कलाबाईंनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मी मागासवर्गीय असल्यामुळे जाणीवपूर्वक माझ्या उमेदवारीला विरोध केला जात आहे, असा त्यांचा आरोप आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीला एकही जागा देण्यास तयार नसल्याचेही त्यांनी सांगितले. कलाबाई शिरसाठ यांनी स्पष्ट केले की, पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष उमेदवारी लढवणार असून, आंदोलन आणि उपोषणचा इशाराही दिला आहे. महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरले असले तरी, अनेक प्रभागांमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली आहे. भाजप उमेदवाराने गुडघ्यावर बसून मानले नेतृत्वाचे आभार दुसरीकडे, पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून गणेश बिडकर यांना प्रथम उमेदवारी अर्ज भरण्याचा मान मिळाला. पक्षाने यादी जाहीर न करता फोनद्वारे परवानगी दिल्याने बिडकर यांनी भवानी पेठ येथे अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी बिडकर यांनी चप्पल काढून थेट गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटील यांच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला. या भावपूर्ण कृतीने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले गेले. चंद्रकांत पाटील यांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले.