Vithabai Narayangaonkar: गर्भवती असतानाही रंगमंच गाजवला! कोण होत्या लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, ज्यांची भूमिका साकारणार श्रद्धा कपूर?
Vithabai Narayangaonkar विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील एका कलावंत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भाऊ बापू नारायणगावकर आणि आई शांताबाई हे दोघेही लोककलेशी निगडित होते.

Vithabai Narayangaonkar: मराठी लोककलेचा इतिहास सांगताना ज्या काही दिग्गज कलाकारांची नावे आदराने घेतली जातात, त्यामध्ये लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नाव अग्रक्रमाने येते. आता त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित ‘ईथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात विठाबाईंची भूमिका साकारणार असल्याने या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘ईथा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर देशभरात विठाबाईंच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी आयुष्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या या कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर तमाशा आणि लावणीला नवी ओळख मिळवून दिली.
विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील एका कलावंत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भाऊ बापू नारायणगावकर आणि आई शांताबाई हे दोघेही लोककलेशी निगडित होते. त्यामुळे लहानपणापासूनच विठाबाईंना कला, संगीत आणि नृत्याचे संस्कार मिळाले. त्यांना शिक्षणापेक्षा कलेत अधिक रस होता. त्यांच्या कलेप्रती असलेल्या ओढीमुळे वडिलांनीही त्यांच्यावर शिक्षणासाठी कधी दबाव आणला नाही. आणि त्यांनी पूर्णपणे कलाक्षेत्रात स्वतःला झोकून दिले.

‘Eetha’ Vithabai Narayangaonkar
तमाशा आणि लावणीच्या माध्यमातून विठाबाईंनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात तमाशा कलाकारांना समाजाकडून फारसा मान दिला जात नव्हता. अनेक सामाजिक रूढी आणि पूर्वग्रहांचा सामना कलाकारांना करावा लागत होता. मात्र विठाबाईंनी आपल्या अफाट प्रतिभा, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर या सर्व अडचणींवर मात केली. त्यांच्या सादरीकरणातील ऊर्जा, आवाजातील ताकद आणि नृत्यकौशल्यामुळे त्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या.
विठाबाईंच्या आयुष्यातील एक प्रसंग आजही लोकांना थक्क करून सोडतो. १९६७ साली त्यांचा तमाशाचा फड शिखर शिंगणापूर येथे मुक्कामी होता. त्या वेळी त्या पूर्ण गर्भवती होत्या. एका कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती अत्यंत कठीण होती. तेथे उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेने दाईची भूमिका पार पाडत त्यांची प्रसूती केली. मात्र या मोठ्या शारीरिक त्रासानंतरही विठाबाईंनी आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. हा प्रसंग त्यांच्या समर्पणाची आणि जिद्दीची साक्ष देणारा मानला जातो.
विठाबाईंच्या कर्तृत्वाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यांच्या तमाशा फडाला तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमोर कला सादर करण्याची संधी मिळाली होती. या सादरीकरणानंतर त्यांच्या फडाची प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तमाशा क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला. कारण प्रथमच एखाद्या तमाशा फडाला राष्ट्रपती स्तरावरील सर्वोच्च सन्मान मिळाला होता.
आज अनेक दशकांनंतर विठाबाईंची कथा रुपेरी पडद्यावर येत आहे. श्रद्धा कपूर त्यांच्या भूमिकेत दिसणार असल्याने नव्या पिढीला या महान कलाकाराचा संघर्ष, त्याग आणि कलेप्रती असलेले समर्पण जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ‘ईथा’ हा चित्रपट केवळ एका कलाकाराची कथा नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा गौरव करणारा ठरणार आहे.





