Aishwarya Rai Bachchan : मिस वर्ल्ड बनली, अभिनेत्री म्हणून गाजली; पण ऐश्वर्याचं हे स्वप्न राहिलं अपूर्ण! कारण…
Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री होण्यापूर्वी ऐश्वर्याचे एक वेगळेच स्वप्न होते. तिला अभिनय क्षेत्रात येण्याऐवजी आर्किटेक्ट बनायचे होते.

Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय बच्चनचे नाव आवर्जून घेतले जाते. आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने तिने केवळ भारतातच नाही, तर जगभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने मनोरंजनविश्वात प्रवेश केला आणि अल्पावधीतच ती लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. मात्र, अभिनेत्री होण्यापूर्वी ऐश्वर्याचे एक वेगळेच स्वप्न होते. तिला अभिनय क्षेत्रात येण्याऐवजी आर्किटेक्ट बनायचे होते.
आर्किटेक्ट बनण्याचं होतं स्वप्न
ऐश्वर्या राय बच्चनचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी कर्नाटकातील मंगळूर येथे झाला. तिचे वडील कृष्णराज राय हे मरीन इंजिनिअर होते, तर आई वृंदा राय या लेखिका आहेत. वडिलांच्या कामानिमित्त तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. ऐश्वर्या अभ्यासात हुशार होती. विशेषतः विज्ञान विषयात तिला अधिक रस होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने महाविद्यालयात आर्किटेक्चर शाखेत प्रवेश घेतला. भविष्यात एक यशस्वी आर्किटेक्ट बनण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, यादरम्यान तिचा कल मॉडेलिंग आणि सौंदर्यस्पर्धांकडे वाढू लागला.
मिस इंडिया स्पर्धेत ठरली होती उपविजेती
१९९४ मध्ये ऐश्वर्या रायने मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत तिला विजेतेपद मिळवता आले नाही. सुष्मिता सेनने मिस इंडियाचा किताब पटकावला, तर ऐश्वर्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याच वर्षी ऐश्वर्याने मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या सौंदर्याने व आत्मविश्वासाने परीक्षकांची मने जिंकली. तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावत भारताची मान उंचावली. या यशानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. मिस वर्ल्ड झाल्यानंतरही शिक्षण पूर्ण करण्याचा तिचा प्रयत्न होता. मात्र, वाढत्या कामाच्या व्यापामुळे तिला आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. ऐश्वर्या रायने एका जुन्या मुलाखतीत आपल्या या अपूर्ण स्वप्नाबद्दल सांगितले होते.
‘हम दिल दे चुके सनम’ने मिळवून दिली खरी ओळख
ऐश्वर्याने १९९७ मध्ये दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. मात्र, १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात तिने नंदिनीची भूमिका साकारली होती. सलमान खानसोबतची तिची अॅानस्क्रिन केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. तिच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक झाले. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
‘देवदास’मधील पारो आजही प्रेक्षकांच्या लक्षात
२००२ मध्ये ऐश्वर्याने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत ‘देवदास’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात तिने साकारलेली पारोची भूमिका विशेष गाजली. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. पारोच्या भूमिकेमुळे ऐश्वर्याच्या अभिनय कारकिर्दीला आणखी मोठी उंची मिळाली. त्यानंतर ऐश्वर्याने हिंदीसोबतच तमिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले. विविध धाटणीच्या भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
कान्स चित्रपट महोत्सवातही उमटवली छाप
ऐश्वर्या रायच्या यशाचा प्रवास केवळ भारतीय चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित राहिला नाही. २००३ मध्ये कान्स चित्रपट महोत्सवाच्या ज्युरीमध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व केले. सौंदर्यस्पर्धेपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रीपर्यंत पोहोचला आहे.






