भारतात नोंदणी होणार्या परदेशी कंपन्यांच्या संख्येत वेगाने घट – हर्ष मल्होत्रा

नवी दिल्ली – करोनानंतर म्हणजे 2020 नंतर भारतात नोंदणी होणार्या परदेशी कंपन्यांच्या संख्येत वेगाने घट होत असल्याची माहिती दस्तूरखुद्द केंद्रीय कंपनी व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिली.
राज्यसभेत या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, कोणत्या कारणामुळे परदेशी कंपन्यांची भारतातील नोंदणी कमी होत आहे हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, मात्र याचा आढावा घेण्याची प्रक्रिया चालू आहे. पाच वर्षांमध्ये भारतात नोंदलेल्या परदेशी कंपन्यांची संख्या 339 असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी आतापर्यंत केवळ पाच कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यातील प्रत्येकी एक कंपनी आंध्र प्रदेश, दिल्ली आणि केरळमध्ये आहे. तर दोन कंपन्या तामिळनाडूमध्ये नोंदण्यात आलेल्या आहेत. यातील एकही कंपनी महाराष्ट्रात नोंदण्यात आलेली नसल्याचे दिसून आले.
ज्या परदेशी कंपन्यांचे मुख्य कार्यालय परदेशात आहे मात्र त्यांच्या उपकंपन्या किंवा मध्यस्थ कंपन्यांचे कार्यालय भारतात आहे आणि त्या माध्यमातून भारतात सेवा किंवा उत्पादन दिले जाते अशा कंपनीला परदेशी कंपन्या असे संबोधले जाते असे त्यांनी सांगितले. या कंपन्या मुख्यत्वे परदेशातूनच भांडवल घेऊन भारतात काम करतात. त्यातील फार कमी कंपन्या देशात भांडवल उभारून काम करतात असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्या वर्षी किती कंपन्या
2020 मध्ये भारतात नोंदण्यात आलेल्या परदेशी कंपन्यांची संख्या 90 होती. 2021 मध्ये ती कमी होऊन 75 झाली. तर 2022 मध्ये ही संख्या आणखी कमी होऊन 64 इतकी झाली. त्यानंतरही परिस्थितीत फरक पडला नाही. 2023 मध्ये भारतात केवळ 57 परदेशी कंपन्या नोंदल्या गेल्या. तर 2024 मध्ये केवळ 53 परदेशी कंपन्यांची भारतात नोंद झाली आहे.





