माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

मुंबई- व्यापार युद्धबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोज नवीन वक्तव्य करत आहेत. त्यामुळे या आघाडीवरील संभ्रम कायम आहे. अशातच माहिती तंत्रज्ञान आणि इंधन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. लवकरच भारतातील कंपन्यांचे पहिल्या तिमाईचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 176 अंकांनी कमी होऊन 83,536 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंकांनी म्हणजे 1.18 टक्क्यांनी कमी होऊन 25,476 अंकावर बंद झाला. एचसीएल टेक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत इलेक्ट्रॉनिक्स, आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर घसरले. तर बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड या कंपन्यांचे शेअर वाढले.
जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद यांनी सांगितले की, जागतिक बाजारात कमालीची अनिश्चित परिस्थिती आहे. दोन ठिकाणी युद्ध चालू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आयात शुल्काबाबत रोज नवी वक्तव्य करीत आहेत. गुंतवणूकदारांना सध्याच्या परिस्थितीत व्यवहार करणे अवघड झाले आहे. त्यामुळे या आठवड्यात निर्देशांक स्थिर पातळीवर असल्याचे दिसून येते. या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 जुलै अगोदर विविध देशांना करार करण्याची सूचना केली होती. आता या मुदतीत एक ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
रॅलीगेअर ब्रोकिंग या संस्थेचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, सध्याच्या अनिश्चित परिस्थितीत भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टीसीएस गुरुवारी पहिल्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर करणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशातच आज माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री झाली.
सध्याच्या वातावरणातही ग्राहक वस्तू, वाहन, सेवा इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे मोठी हानी टळली असे सांगण्यात आले. भारताप्रमाणे जागतिक बाजारात संमिश्र वातावरण आहे. ट्रम्प यांनी अनेक देशाविरोधात आयात शुल्काची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरिया, जपान इत्यादी देशातील शेअर निर्देशांक वाढले. या दोन्ही देशाविरोधात ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढविण्याची घोषणा केली आहे. चीन आणि हाँगकाँग मधील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. तर अमेरिकन शेअर बाजाराचे निर्देशांक मंगळवारी कमी पातळीवर बंद झाले होते.
दरम्यान सौदी अरेबियाने आशियासाठीच्या तेलाच्या किमतीत वाढ केल्यामुळे आणि अमेरिकेतील तेल उत्पादन कमी झाल्यामुळे खनिज तेलाच्या किमती वाढून 70 डॉलरपर्यंत गेल्या आहेत. सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी 26 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशातील गुंतवणूकदारांनी 1,366कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.



