अमेरिकेच्या व्हिसा शुल्कवाढीमुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली – अमेरिकेने परकीय कंपन्यांना अमेरिकेत येण्यासाठी लागणार्या व्हिसावरील शुल्क 5,000 डॉलर वरून 1 लाख डॉलर केले आहे. यामुळे सोमवारपासून शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची चालू असलेले पीछेहाट बुधवारी चालूच राहिली.
बुधवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 0.69 टक्क्यांनी कोसळून 34,529 अंकावर बंद झाला. प्राप्त माहितीनुसार मास्टेक कंपनीचा शेअर 3.42 टक्क्यांनी, इन्फोबिन्स कंपनीचा शेअर 3.41 टक्क्यांनी, विप्रो कंपनीचा शेअर 2.6 टक्क्यानी, टेक महिंद्रा कंपनीचा शेअर 1.30 टक्क्यांनी, टीसीएस कंपनीचा शेअर 0.86 टक्क्यांनी कमी झाला.
अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांत जाणार्या परकीय नागरिकांमध्ये भारतीयांचे प्रमाण 70% इतके आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतातील कर्मचार्यावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट होत असल्याचे जिओजीत इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
याच कारणामुळे एकूणच शेअर बाजारात नकारात्मक वातावरण असून मुख्य निर्देशांकातही बुधवारी बरीच घट झाली. मोतीलाल ओसवाल फायनान्शीअल सर्विसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, अमेरिकेने भारताविरोधात आयात शुल्क लावण्याबरोबरच व्हिसाचे शुल्क वाढविले आहे. अमेरिकेची भारता विरोधात नकारात्मक भूमिका जाहीर झाली आहे.
अशा परिस्थितीत इतर क्षेत्रावरही याचा परिणाम होत आहे. विशेष म्हणजे परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यातल्या त्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून या कंपन्या गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या निर्देशांकावर परिणाम होत आहे. भारत -अमेरिका संबंध सुधारल्याशिवाय या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता कमी आहे.





