आठशेचा शेअर थेट 936 वर! एनएसडीएलच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तगडा प्रतिसाद

मुंबई – नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी म्हणजे एनएसडीएल कंपनीची शेअर बाजारावर चमकदार नोंदणी झाली. आयपीओतील या कंपनीच्या शेअरचा भाव आठशे रुपये होता. त्यामध्ये आज 17% वाढ होऊन या शेअरचा भाव 936 रुपयावर गेला.
शेअरच्या या किमतीच्या आधारावर या कंपनीचे बाजार मूल्य आता 18,270 कोटी रुपये इतके झाले आहे. आज मुंबई शेअर बाजारावर या कंपनीच्या 3.7 कोटी शेअरचे व्यवहार झाले. शेअर बाजारात व्यापार युद्धामुळे नकारात्मक वातावरण होते. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक पाव टक्क्याने कमी झाले असले तरी एनएसडीएलच्या शेअरची मागणी मात्र वाढून या कंपनीच्या शेअरचा भाव वाढला.
या कंपनीने आयपीओमधून 4,011 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या शेअरपेक्षा 41 पटीने या शेअरला मागणी आली होती. देशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी या आयपीओला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल या कंपनीने समाधान व्यक्त केले आहे. या पैशाचा उपयोग तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाकरता केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.





