भारतीय तेल कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या

मुंबई – जागतिक अर्थव्यवस्थेत आणि व्यापारात उलथापालक होत असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक सकारात्मक बाबी घडून येत आहेत. पुरवठा वाढल्यामुळे आणि मागणी कमी झाल्यामुळे जागतिक खनिज तेल बाजारात खनिज तेलाचा दर मोठ्या प्रमाणात कमी झाला.
प्राप्त माहितीनुसार ब्रेंट क्रूड या खनिज तेलाचा दर 1.45 टक्क्यांनी घसरून 60.40 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेला. भारत जास्त प्रमाणात हे खनिज तेल खरेदी करतो. यानंतर भारतातील हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन या तेल कंपनीचा शेअर 6.65 टक्क्यांनी , इंडियन ऑइल कार्पोरेशनचा शेअर 3.66 टक्क्यांनी, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचा शेअर 3.25 टक्क्यांनी उसळला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे संशोधक सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, खनिज तेलाचे दर कमी झाल्यानंतर खनिज तेलाचे शुद्धीकरण करणार्या कंपन्याबरोबरच तेलाशी संबंध असलेल्या इतर कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 1.7 टक्क्यांनी वाढला.
खनिज तेलाचे दर कमी झाल्यानंतर तेल शुद्धीकरण करणार्या कंपन्यांच्या नफ्यात वाढ होत असते. इंधनाचा जास्त वापर करणार्या विमान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. इंडिगो कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी 3.67 टक्क्यांनी वाढला. पेट्रोलियमचा वापर करणार्या तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात दोन टक्क्यापर्यंत वाढ झाली. शेअर बाजारात सकारात्मक वातावरण असल्यामुळे तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ होण्यास मदत झाली.
रुपया वधारला 24 पैशांनी
खनिज तेलाचे दर कोसळल्याचा अप्रत्यक्ष फायदा रुपयाला झाला. सोमवारी रुपयाचा भाव 24 पैश्यानी वाढून 84 रुपये 33 पैसे प्रति डॉलर या पातळीवर गेला. दोन आठवड्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढवत आहेत. याचाही फायदा रुपयाला होत आहे. त्याचबरोबर भारताचा परकीय चलन साठा वाढत असल्यामुळेही रुपयाचा भाव वाढण्यास मदत होत आहे. जागतिक पातळीवर नकारात्मक घटना घडत असतानाच भारतासाठी या सकारात्मक घटना घडत आहेत.




