Share Market: २०२५ सालाचा निरोप उत्साहात घेणाऱ्या भारतीय शेअर बाजारासाठी नव्या वर्षातील सोमवारचा पहिला व्यवहार दिवस निराशाजनक ठरला. अत्यंत चढ-उताराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले. व्यवहारादरम्यान निफ्टीने आपल्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता, मात्र त्यानंतर आलेल्या नफावसुलीच्या लाटेमुळे बाजाराला सावरता आले नाही. व्यवहाराच्या अखेरीस, बीएसई सेन्सेक्स ३२२.३९ अंकांच्या म्हणजेच ०.३८ टक्क्यांच्या घसरणीसह ८५,४३९.६२ वर स्थिरावला. त्याचप्रमाणे निफ्टीमध्ये ७८.२५ अंकांची घसरण होऊन तो २६,२५०.३० च्या पातळीवर बंद झाला. या घसरणीमुळे अवघ्या एका दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे ४८,००० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. बीएसईमधील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४८१.२४ लाख कोटींवरून कमी होऊन ४८०.७६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. या मोठ्या पडझडीमागे जागतिक घडामोडींचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेने वेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण झाली असून गुंतवणूकदार सावध भूमिकेत दिसत आहेत. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर नवीन आयात शुल्क लावण्याची धमकी दिल्याने भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली. यासोबतच भारतीय रुपयाची झालेली घसरणदेखील बाजाराच्या पथ्यावर पडली नाही. क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार करता, आयटी, तेल आणि वायू तसेच टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्समध्ये एक टक्क्यापर्यंत घसरण झाली. दुसरीकडे, संरक्षण आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील ३० प्रमुख शेअर्सपैकी १६ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १४ शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरने सर्वाधिक ४.६७ टक्क्यांची झेप घेतली. तर एचडीएफसी बँक ३.७९ टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक तोट्यात राहिली. दिवसभरात एकूण ४,४७१ शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यापैकी १,७२३ शेअर्स वधारले तर २,५४२ शेअर्स घसरणीसह बंद झाले. विशेष म्हणजे बाजारात घसरण असूनही २०९ शेअर्सनी आपल्या ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर १४४ शेअर्सनी निच्चांकी पातळी गाठली. शेअर बाजारातील घसरणीची मुख्य कारणे – आयटी (IT) शेअर्समध्ये मोठी विक्री – आजच्या सत्रात आयटी क्षेत्रात सर्वाधिक कमजोरी दिसून आली. निफ्टी आयटी इंडेक्स जवळपास २ टक्क्यांनी कोसळला. या इंडेक्समधील सर्व १० शेअर्स लाल निशाण्यावर (तोट्यात) व्यवहार करत होते. विशेषतः विप्रो, HCL टेक आणि इन्फोसिसमध्ये ३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. अमेरिकन बाजारातील जोखीम आणि नवीन टॅरिफच्या भीतीमुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. तसेच, ब्रोकरेज फर्म CLSA ने भारतीय आयटी क्षेत्राबाबत सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांना आपला हिस्सा कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, आयटी कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत असू शकतात. ट्रम्प यांची नवीन टॅरिफची धमकी – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील विधानाने बाजारातील वातावरण बिघडले आहे. भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत असून अमेरिका यावर नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गरज पडल्यास भारतावर टॅरिफ (कर) वाढवले जाऊ शकतात, अशी धमकीही त्यांनी दिली. अशा विधानांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढते. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे रणनीतिकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, २०२६ वर्षाची सुरुवात मोठ्या भू-राजकीय घडामोडींनी झाली आहे, ज्याचा जागतिक बाजारावर खोलवर परिणाम होऊ शकतो. रुपयाची घसरण – डॉलरच्या तुलनेत रुपयावरही दबाव दिसून आला. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ४ पैशांनी कमकुवत होऊन ९०.२४ वर पोहोचला. जागतिक तणाव आणि डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे रुपयावर हा दबाव कायम राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी घट काहीसा दिलासा देऊ शकते.