Share Market : सलग तिसर्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात वाढ

मुंबई : आखातातील युद्ध संपुष्टात आल्यामुळे आता जागतिक वातावरण निवळत आहे. त्याचबरोबर भारत- अमेरिकेदरम्यान लवकरच व्यापार करार होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सलग तिसर्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली. आजच्या तेजीचे नेतृत्व एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी केले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,000 अंकांनी वाढून 83,755 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 304 अंकांनी म्हणजे 1.21 टक्क्यांनी वाढून 25,549 अंकावर बंद झाला. टाटा स्टील, बजाज फायनान्स, एअरटेल, अदानी पोर्ट्स, इटर्नल, बजाज फिन्सर्व, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक या कंपन्यांनी तेजीचे नेतृत्व केले.
ट्रेन्ट, स्टेट बँक, महिंद्रा, मारुती या कंपन्या पिछाडीवर राहिल्या. जागतिक बाजारात आज सकारात्मक वातावरण होते. जपान दक्षिण, कोरिया, चीन, हाँगकाँग येथील निर्देशांक वाढीव पातळीवर होते. युरोपातील निर्देशांक वाढले. तर अमेरिकेतील निर्देशांक स्थिर राहिले. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात बुधवारी 2,427 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,372 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जागतिक वातावरण सकारात्मक असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. मात्र निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांनी नमूद केली. विश्लेषकांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान, रिअॅल्टी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर होते. इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले.




