मुंबई : भारत -अमेरिका व्यापार कराराची बोलणी अंतिम टप्प्यात असतानाच पहिल्या तिमाहीचे ताळेबंद विविध कंपन्या लवकरच सादर करणार आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार सावध असून किरकोळ गुंतवणूकदार काही प्रमाणात विक्री करून नफा काढून घेत आहेत. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 170 अंकांनी कमी होऊन 83,239 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48 अंकांनी म्हणजे 0.19 टक्क्यांनी कमी होऊन 25,405 अंकावर बंद झाला. कोटक महिंद्रा बँक, बजाज फिन्सर्व, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, ट्रेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया, टायटन, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. तर मारुती, इन्फोसिस, एनटीपीसी, एशियन पेंट्स, ईटरनल, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. रेलीगेअर ब्रोकिंग या कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आणि देशातील आणि परदेशातील अनेक महत्त्वाच्या घटना घडत असल्यामुळे गुंतवणूक सध्या सावध आहेत. त्यामुळे निर्देशांका थोडीफार घट झाली. मुख्य निर्देशांकांबरोबरच छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित मिडकॅप आणि स्मॉल कॅप अस्थिर आहेत. वाहन आणि औषधी क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या. तर धातू आणि रिअॅल्टी क्षेत्रातील कंपन्या पिछाडीवर होत्या. दक्षिण कोरिया, जपान, शान्घाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. तर हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. युरोप आणि अमेरिकेतही संमिश्र वातावरण आहे. भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्याची आकडेवारी बाहेर येत आहे. परवा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढली असल्याचे आकडेवारी जाहीर झाली. जीएसटी संकलन वाढत आहे. व्याजदर कमी पातळीवर आहेत. त्यामुळे आगामी काळ भारतासाठी आशादायक आहे. अशा परिस्थितीत दीर्घ पल्ल्यात निर्देशांक वाढण्याची शक्यता जास्त असल्याचे विश्लेषकांना वाटते. दरम्यान भारत- अमेरिका व्यापार करारासंदर्भातील अंतिम बोलणी सध्या चालू असून नऊ जुलैपूर्वी या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी इतकीच विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. मंगळवारी या गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यानंतर बुधवारी या गुंतवणूकदारांनी 1,561 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र डॉलर कमकुवत आहे. खनिज तेलाचे दर कमी आहेत. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करत राहण्याची शक्यता जास्त असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.