शरद यादव यांच्या कन्येचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली –माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
शरद यादव यांच्या लोकतांत्रिक जनता दलाने (लोजद) बिहारमधील निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कन्येशी संबंधित घडामोडीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुभाषिनी यांच्याबरोबरच लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) माजी खासदार काली पांडे यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या दोघांनाही कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस प्रवेशानंतर सुभाषिनी यांनी त्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले.
प्रकृती ठीक नसल्याने माझ्या वडिलांचा निवडणुकीत सक्रिय सहभाग नसेल. त्यांनी नेहमीच विरोधकांच्या महाआघाडीला पाठिंबा दिला. आता महाआघाडीचा लढा पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे, असे त्यांनी म्हटले. विरोधकांच्या महाआघाडीत कॉंग्रेस, राजद आणि लहान पक्षांचा समावेश आहे.
सुभाषिनी आणि पांडे यांचा कॉंग्रेस प्रवेश महाआघाडीची ताकद वाढवण्यासाठी हातभार लावणारा ठरणार आहे.





